मुंबई – राज्याच्या विधानभवनात काल घडलेल्या गोंधळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे. ‘तुमच्या लोकांनी जर राडा केला असेल, तर त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग परिणामांना जबाबदार तुम्हीच असाल,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
विधानभवनाच्या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. त्याचे रूपांतर काही ठिकाणी हातघाईतही झाले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत संताप व्यक्त करत सरकारला खुले आव्हान दिलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, “लोकशाहीत असं वागणं योग्य नाही. जर आमच्या लोकांनी राडा केला असता, तर सरकारने त्यांच्यावर लगेचच गुन्हे दाखल केले असते. मग तुमच्या लोकांवर कारवाई का होत नाही? आम्ही शांत बसणार नाही.”
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘विधानभवनासारख्या पवित्र ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील, तर जनतेला काय संदेश जातो?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सरकारकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र राज ठाकरे यांनी दिलेलं हे ओपन चॅलेंज राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलं आहे.