कोल्हापूर | प्रतिनिधी
नांदणी (कोल्हापूर) येथील जैन मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीणीच्या गुजरातमधील ‘वनतारा’ प्राणी संवर्धन केंद्रात झालेल्या स्थलांतरामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाचा भडका उडाला आहे. या प्रकरणावरून नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, ४८ तासांत सव्वादोन लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना यासंदर्भात अर्ज पाठवले आहेत. सोशल मीडियावर ‘रिलायन्स विरोधात’ भावना तीव्र होत असताना, अखेर वनतारा या केंद्राने आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
जनभावनांचा सन्मान करत थेट संवाद – वनतारा
वनताराच्या निवेदनात म्हटलं आहे की,
“कोल्हापूरच्या जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी मठातून अलीकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणीशी संबंधित लोकांच्या भावना आम्हाला समजतात आणि त्यांचा आम्ही आदर करतो. तिचे त्या मठातील अस्तित्व हे केवळ प्रतीकात्मक नव्हते, तर अनेकांसाठी पवित्रतेचं प्रतीक होतं.”
यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की,
“वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केलेली नाही. हे स्थलांतर माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आलं आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे. आम्ही केवळ या न्यायिक आदेशाची अंमलबजावणी करणारी संस्था आहोत.”
आरोग्य आणि कल्याण हाच केंद्रबिंदू
पशुसंवर्धन केंद्राने आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना सांगितले की,
“माधुरी हिच्या आरोग्याचे व दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू आहे. संपूर्ण स्थलांतर प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर निकषांनुसार पार पडली आहे.”
कोल्हापुरातील आंदोलन आणि वाढता रोष
माधुरी हत्तीणीच्या समर्थनार्थ कोल्हापुरातील नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. अनेकांनी रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर वनताराने आपली सहानुभूती व्यक्त करत म्हटले की,
“कोल्हापुरातील जैन मठ आणि पूज्य स्वामीजींशी थेट संवाद सुरू करण्यात आला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत. जनतेच्या भावना आणि प्राण्याच्या कल्याणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
धर्म, परंपरा आणि करुणेच्या विरोधात नाही – वनतारा स्पष्ट
“वनतारा कोणत्याही धर्म, परंपरा किंवा प्रांताच्या विरोधात नाही. आमचा उद्देश मुक्या जीवांची सेवा करण्याचा आहे. आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि मानवी करुणेला वचनबद्ध आहोत. जनतेला संघर्षासाठी नव्हे, तर प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्यासोबत उभं राहण्याचं आवाहन करतो.”
माधुरीच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे
दरम्यान, वनताराकडून मिळालेल्या माहितीनुसार माधुरी हत्तीणीवर वैद्यकीय उपचार सुरू असून, तिच्या आरोग्याची नियमित निगा राखली जात आहे. तिला स्वच्छ, सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणात ठेवण्यात आलं आहे.
कोल्हापुरातील नागरिकांची भावना ही श्रद्धेच्या आणि नात्याच्या पातळीवर खोल आहे. वनताराकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया भावनिक संतुलन राखत, कायदेशीरतेची व्याख्या स्पष्ट करत आहे. आता पुढील टप्प्यात न्यायालय, वनतारा आणि जैन मठ यांच्या संवादातून माधुरीच्या आयुष्याचा योग्य निर्णय काढला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.