मराठी बातम्या ग्रूप जॉईन करा

“आम्ही दोघं भाऊ एकत्र का आलो?” उद्धव ठाकरे यांचं स्पष्ट मत; गिरणी कामगारांच्या मोर्चात मोठं वक्तव्य

मुंबई | ९ जुलै २०२५

शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास २० वर्षांनंतर एकाच मंचावर ‘मराठी विजय मेळाव्या’च्या निमित्ताने एकत्र आले. यामुळे दोघा चुलत भावांमधील युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या. मात्र, या एकत्र येण्यामागील कारणावर अखेर उद्धव ठाकरे यांनी स्वतः भाष्य करत मनातलं स्पष्ट केलं.

“राजकारणासाठी नाही, मराठी माणसासाठी आलो!”

आज मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या गिरणी कामगारांच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सांगितले की,

“आम्ही दोघं भाऊ एकत्र आलोय ते राजकीय पोळ्या भाजण्यासाठी नाही, तर मराठी माणसासाठी. आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे नातवंडं. माझे आजोबा, बाळासाहेब आणि काका श्रीकांत ठाकरे हे तिघंही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभागी होते. आणि जर आमच्या डोळ्यांदेखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल, तर आम्ही भांडत बसायचं का?”

गिरणी कामगारांना घरे हवीत, शेलू- वांगणी नव्हे!

उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नांवरही ठाम भूमिका मांडली.

“कामगारांच्या उरावर टॉवर उभे केले. सोन्यासारखी जागा गिरणी मालकांच्या घशात घातली. ज्यांनी मुंबई मिळवून दिली, त्यांना शेलू-वांगणीला पाठवलं. ही शरमेची बाब आहे.”

त्यांनी स्पष्ट मागणी केली की,

“गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर घरे द्यावीत.”

“जो मराठी माणसाच्या मुळावर येईल, त्याला उखडून टाकू!”

“आता आम्ही एकत्र आलो आहोत. जो जो मराठी माणसाच्या मुळावर येईल, त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी तयार आहोत. धीर सोडू नका, हिंमत हरू नका, कारण एकजुटीची वज्रमूठ असली पाहिजे,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

राजकीय संकेत की सामाजिक एकजूट?

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मंचावरील उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण आले असले, तरी उद्धव ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण देत याला राजकारणाचा नव्हे, तर मराठी अस्मितेचा भाग असल्याचं ठामपणे सांगितलं.


ही एकत्र येण्याची वेळ केवळ राजकीय नव्हे, तर मराठी समाजाच्या हक्कासाठी संघर्षाची नांदी असल्याचे स्पष्ट संकेत या भाषणातून मिळतात.

Leave a Comment