बीड बातमीदार – शहरातील तेलगाव नाका परिसरात एका तरुणावर चार ते पाच जणांच्या टोळीने कोयता आणि सत्तुरने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शेख असीम अनिस (वय २४) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख असीम हे तेलगाव नाका भागातून जात असताना काही अज्ञात गुंडांनी त्याला अडवले. या गुंडांच्या हातात धारदार शस्त्रे – कोयता आणि सत्तुर होते. त्यांनी सुरुवातीला असीम याला धमकावत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अचानक त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले.
या हल्ल्यात असीम याच्या हाताला गंभीर जखम झाली असून तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. शहरात दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.