मराठी बातम्या ग्रूप जॉईन करा

‘सोडून टाक आप्पा…’ म्हणत सोशल मीडियावर भाईगिरी; पोलिसांनी तरुणाची जिरवली

पाचोरा, जि. जळगाव | प्रतिनिधी

सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून धमकी देत भाईगिरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पाचोरा येथे गणेश बागुल या तरुणाने ‘सोडून टाक आप्पा, मला मारायचे ख्वाब… तुमच्या पण टॉपचा आणलाय मी बाप…’ अशा आशयाचं रील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळेत कारवाई करत या ‘इंटरनेट भाईगिरी’वर लगाम लावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर अशा प्रकारची भाईगिरी करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच पाचोरा बसस्थानक परिसरात एका तरुणाची १२ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची अधिक दक्षता वाढली असून, सामाजिक माध्यमांवरील अशा पोस्ट्सवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

पोलिसांनी गणेश बागुल यास ताब्यात घेतल्यावर त्याला चांगलाच पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. चौकशीनंतर आरोपीने हात जोडून माफी मागतानाचा व्हिडीओही तयार केला. सध्या सोशल मीडियावर या दोन्ही व्हिडीओंची मोठी चर्चा सुरू आहे.

पाचोरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या रील्समुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे यावर कठोर पावले उचलण्यात येत आहेत. ‘दहशत माजवणाऱ्यांची दहशतच संपवायची’ हे धोरण स्वीकारत पोलिसांनी हा प्रकार हाताळला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment