कोल्हापूर | ९ जुलै २०२५
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘हळद रुसली कुंकू हसलं’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, मालिकेतील कलाकारांची कामगिरी विशेष गाजत आहे. या मालिकेतील ‘कृष्णा’ या व्यक्तिरेखेमुळे अभिनेत्री समृद्धी केळकर सध्या चर्चेत आली आहे. तिच्या अलीकडील एका धाडसी दृश्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
स्वातीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी!
मालिकेतील कथानकानुसार कृष्णाची लाडकी गाय स्वाती विहिरीत पडते, आणि तिला वाचवण्यासाठी कृष्णा कोणताही विचार न करता 40 फूट खोल विहिरीत उडी मारते. विशेष म्हणजे हा प्रसंग अस्सल शेतातल्या विहिरीतच शूट करण्यात आला होता, आणि समृद्धीने बॉडी डबल न वापरता स्वतः हा सीन पूर्ण केला.
“वन टेक होता ओ!” – समृद्धी केळकर
या अनुभवाबद्दल समृद्धी केळकर म्हणाली,
“मला पोहायला येतं, पण इतक्या खोल विहिरीत मी कधीच गेले नव्हते. सीन ऐकून पोटात गोळा आला होता. पण कृष्णासारखी हिंमत दाखवायची हे आधीच ठरवलं होतं. कोल्हापूरजवळच्या एका शेतात हा सीन शूट झाला. एकाच टेकमध्ये सीन पूर्ण करायचा होता, त्यामुळे प्रेशरही होतं.”
“आई अंबाबाईचं नाव घेतलं आणि मी उडी मारली. माझ्यासोबत दोन अनुभवी पोहणारेही होते. टीमने खूप काळजी घेतली. हा अनुभव आयुष्यात कधीच विसरणार नाही. आत्मविश्वास द्विगुणित झाला!” असं ती पुढे म्हणाली.
व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव
समृद्धीने या धाडसी स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, चाहत्यांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओला तिच्या खास ‘कृष्णा स्टाईल’ मध्ये कॅप्शन देत तिने लिहिलं:
“त्ये कसाय माहित्ये का? इहिरीत उडी मारायची आहे कळल्यानंतर पोटात मोठ्ठा गोळा आला. पन कृष्णेच्या कोल्हापूरी छातीतलं बळ जागं झालं अन् आई अंबाबाईचं नाव घेऊन… अख्ख्या टिमचा फुल्ल सपोर्ट!”
‘हळद रुसली कुंकू हसलं’ला मिळतंय भरभरून प्रेम
ही मालिका दररोज दुपारी 1 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते. समृद्धी केळकरसोबत या मालिकेत अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिकेत आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, मराठी मातीचा गंध आणि भावनिक कथानक यामुळे ही मालिका घराघरांत पोहोचत आहे.
विशेष: समृद्धी केळकरसारख्या अभिनेत्रींनी जेव्हा शारीरिक आणि मानसिक तयारीने अस्सल सीन पार पाडले, तेव्हा अभिनयाच्या पलीकडे जाऊन प्रेरणा देणारे उदाहरण घडते