मराठी बातम्या ग्रूप जॉईन करा

मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस; ५ वर्षांत संपत्ती १२ कोटींनी वाढली!

छत्रपती संभाजीनगर | पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आता आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. पाच वर्षांत संपत्तीत मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. स्वतः शिरसाट यांनीच ही माहिती छत्रपती संभाजीनगर येथे चार्टर्ड अकाउंटंट्सच्या कार्यक्रमात दिली.

२०१९ ते २०२४: संपत्ती १ कोटी २१ लाखांवरून थेट १३.३७ कोटींपर्यंत

मंत्री शिरसाट यांनी २०१९च्या निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात एकूण संपत्ती ₹1.21 कोटी असल्याचे नमूद केले होते. मात्र २०२४ मध्ये तीच संपत्ती ₹13.37 कोटींवर गेली.
त्यांची स्थावर मालमत्ता ₹1.24 कोटी वरून ₹19.65 कोटींवर पोहोचली.
दागिन्यांची किंमत ₹16 लाखांवरून ₹1.42 कोटींवर गेल्याचेही नोंद आहे.

हॉटेल विट्स प्रकरण, जमीन घोटाळा आणि अधिक संशय

शिरसाट यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून विविध आरोप झालेत:

  • हॉटेल विट्स प्रकरण: ११० कोटींचे हॉटेल केवळ ६५ कोटींना विकल्याचा आरोप
  • वर्ग २ ची जमीन मुलाच्या नावावर खरेदी
  • २५ कोटींची मालमत्ता ५ कोटींना खरेदी
  • दुबईहून आली ‘अडीच कोटींची’ गाडी

या सगळ्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा संशय निर्माण झाला आहे.

आयकर नोटीसबाबत शिरसाट काय म्हणाले?

“आयकर विभागाने मला विचारणा केली आहे की, तुमची संपत्ती इतकी कशी वाढली? त्यांनी उत्तरासाठी ९ जुलैपर्यंतची मुदत दिली होती, पण मी वेळ वाढवून मागितली आहे. मी कायदेशीर उत्तर नक्की देणार,”
संजय शिरसाट, मंत्री

ईडी आणि एसीबीनेही चौकशी करावी – इम्तियाज जलील

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणावर जोरदार टीका करत म्हटले की:

“फक्त आयकर विभाग नव्हे तर ईडीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यांचीही चौकशी करावी. प्रशासन आणि पोलीस जर नेत्यांची गुलामी करत राहिले, तर अशा प्रकारांना आळा बसणार नाही.”

शिरसाट यांचे वक्तव्य: “ब्लॅकचे पैसे आता चालणार नाहीत”

कार्यक्रमात बोलताना शिरसाट म्हणाले:

“ब्लॅकचे पैसे यापुढे चालणार नाहीत. मी हे स्वतःसाठी सांगतोय, कारण मी सुद्धा आज इन्कम टॅक्स नोटीसच्या अनुभवातून जात आहे. पैसे कमवणं सोपं झालंय पण ते वापरणं कठीण झालंय.”

Leave a Comment