पक्षात नव्या लोकांना संधी देणार – आ. रोहित पवार यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आता नव्या उमेदीने संघटनेची बांधणी करत असून, जनतेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या निडर कार्यकर्त्यांना पक्षात मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार असल्याची ग्वाही पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

सातारा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवा नेते साहिल शिंदे, तसेच इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्ष संघटनात्मक बाबींवर, कार्यपद्धतीवर आणि आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीदरम्यान बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना आम्ही सर्वांनीच बळ द्यायला हवे.

ते पुढे म्हणाले, “पवार साहेबांचे विचार आणि तत्वांवर निष्ठा ठेवणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांना, महिला कार्यकर्त्यांना सोबत घेत नव्या वाटचालीला सुरुवात झाली आहे. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही न्याय दिला जाणार आहे.

आ. रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, “केवळ बातम्यांमध्ये फोटो येण्यासाठी किंवा कार्यक्रमात पुढच्या रांगेत बसण्यासाठी धडपड करणाऱ्यांना नव्हे, तर खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पक्षात महत्वाची जबाबदारी देण्यात येईल.

विविध सेलच्या निवडी लवकरच पार पाडल्या जातील आणि त्या प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमतेला प्राधान्य दिले जाईल. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी आ. रोहित पवार यांनी केला.

पक्षात नव्याने येणाऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, महिलांना नेतृत्वाची संधी देणे आणि युवकांचा राजकारणात सक्रीय सहभाग वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेच्या विविध कामांबाबत आपली मते मांडली व आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नव्या जोमाने संघटनात्मक बळकटीसाठी पुढे सरसावत आहे आणि त्यामध्ये संघर्षशील व तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान व संधी दिली जाणार आहे, हे या बैठकीतून स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *