पुणे | प्रतिनिधी – पुण्यातील नाना पेठ परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष गणेश कोमकर (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून, तो माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा भाचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर क्लासमधून घरी परतत असताना त्याच्या घराखालील बेसमेंटमध्ये दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, आयुषचे वडील गणेश कोमकर हे वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहेत. त्यामुळे हा खून बदल्याच्या भावनेतून झाला का? याबाबत चर्चा रंगली असली तरी पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
पोलिसांची माहिती
या घटनेनंतर पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले –
- “शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजता ही घटना घडली. दोन अज्ञात आरोपींनी आयुषवर गोळ्या झाडल्या. आम्हाला हल्लेखोरांविषयी काही महत्त्वाची माहिती मिळाली असून त्यावरून तपास वेगाने सुरू आहे. सहा क्राईम ब्रांच पथकं आणि झोन १ मधील सर्व डीबीटी टीम आरोपींचा शोध घेत आहेत.”
- “फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यावरून तपास पुढे जात आहे. लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल.”
- “वनराज आंदेकर खून प्रकरणाशी या हत्येचा संबंध आहे का, यावर आत्ताच काही सांगता येणार नाही. ठोस पुरावे मिळाल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.”
पुढील तपास
या हत्येमुळे नाना पेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सुरक्षा कडक केली आहे. आयुष कोमकरच्या कुटुंबीयांकडून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.