अमरावती, प्रतिनिधी | अमरावती शहरात शुक्रवारी एका महिला पोलिस कॉन्स्टेबलची घरात घुसून गळा दाबून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. विशेष म्हणजे, सदर महिला कॉन्स्टेबलचा पती देखील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये कार्यरत आहे. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या गुन्ह्याचा उलगडा केला असून, या हत्येचा मास्टरमाइंड दुसरं-तिसरं कोणी नसून पतीच असल्याचं उघड झालं आहे.
हत्या झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आशा तायडे-घुले (वय ३८) असं असून त्या फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांचा पती राहुल तायडे हा SRPF मध्ये कर्मचारी असून, त्याच्यावर आपल्या दोन मित्रांच्या मदतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे.
प्रेमसंबंधातून उद्भवलेला वाद बनला मृत्यूचं कारण
पोलिस तपासात समोर आलं आहे की आरोपी राहुल तायडे याचे गेल्या काही वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याचा पत्नी आशा घुलेसोबत वारंवार वाद होत होता. राहुल व आशा यांचा प्रेमविवाह झाला होता व त्यांना १२-१३ वर्षांचे दोन मुलं आहेत. परंतु बाहेरील संबंधांमुळे घरात तणाव वाढत गेला.
राहुलने आपल्या दोन मित्रांसोबत मिळून एक महिना आधीच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी गुरुकृपा कॉलनी, फ्रेजरपुरा, अमरावती येथे घरात चोरी झाली असल्याचा बनाव करत आशा घुलेंचा गळा दाबून खून करण्यात आला.
२४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या
फ्रेजरपुरा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. चौकशीत आरोपी राहुल तायडे याच्यावर संशय गडद होत गेला. अखेर पोलिसांच्या चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पोलिस तपास अजूनही सुरू असून, त्याचे दोन मित्र आरोपी म्हणून तपासाच्या कक्षेत आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याने संपूर्ण पोलीस दलात हादरा बसला आहे.