मुंबई | प्रतिनिधी
PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता मिळाल्यानंतर जवळपास चार महिने उलटले तरी पुढील हप्ता अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यानंतर 20 वा हप्ता 18 जुलै 2025 रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
19 वा हप्ता कधी वितरित झाला होता?
24 फेब्रुवारी 2025 रोजी 19 वा हप्ता जारी करण्यात आला होता. या आधारे 20 वा हप्ता जून-जुलै महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित होता. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.
पंतप्रधानांचा दौरा आणि संभाव्य घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलै 2025 दरम्यान परदेश दौऱ्यावर होते. पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते वितरित केला जातो. त्यामुळे 9 जुलैनंतर हप्ता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
विलंबामागील कारणं काय?
सरकार सध्या शेतकऱ्यांच्या eKYC, किसान आयडी तयार करणे, आणि डेटा दुरुस्ती यावर भर देत आहे. अनेक पात्र शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यामुळे मंजुरी प्रक्रियेत विलंब झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये हप्ता वितरणास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
मोदींचा मोतिहारी दौरा – घोषणा याच ठिकाणी?
सूत्रांनुसार, 18 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहारमधील मोतिहारी दौरा निश्चित आहे. याच कार्यक्रमात 20 वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुका लक्षात घेता, केंद्र सरकारकडून या राज्यातून हप्त्याची घोषणा करून राजकीय संदेश देण्याची रणनीती असू शकते.
अधिकृत तारीख अद्याप नाही
सद्यस्थितीत केंद्र सरकारकडून PM किसान 20 व्या हप्त्यासाठी कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मोदी यांच्या परतीनंतर आणि मोतिहारी दौऱ्यानंतर हप्ता जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे.
महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांसाठी
✅ eKYC पूर्ण केली आहे का, याची खात्री घ्या
✅ बँक खात्याची माहिती अचूक आहे का, तपासा
✅ पीएम किसान पोर्टलवर तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, ते पहा