नेकनूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण व विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार

नेकनूर (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नुकतीच नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन शालेय मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी सध्या फरार आहेत.

ही घटना २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता घडली. शाळेत जाणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीला तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन परत येत असताना शुभम नंदकुमार बोरखेडे, सुनील ऊर्फ सोनू मधुकर केमकर आणि एक अनोलखी इसम यांनी अडवले. त्या तिघांनी जबरदस्तीने तिला एका चारचाकी वाहनात टाकून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व विनयभंग केला.

पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, आरोपींनी तिला धमकी दिली की, “घडलेली गोष्ट कुणाला सांगितली तर तुला जिवंत ठेवणार नाही.” तसेच, तिला एका पाईपने मारहाण करण्यात आल्याचेही पीडितेने सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 203/25 नुसार खालील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  • भादंवि कलम 137(2), 74, 118(1), 115(2), 3(5),
  • पोक्सो कायदा 2012 अंतर्गत कलम 8 व 12

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांच्या आदेशानुसार पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.

सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *