मुंबई | प्रतिनिधी
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून नुकतीच ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यंदाच्या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीचा झगमगाट स्पष्टपणे दिसून आला आहे.
या पुरस्कारांमध्ये साने गुरुजी यांच्या साहित्यावर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. तर, प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आणि लहानग्यांच्या भावविश्वात डोकावणारा ‘नाळ २’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार मिळवला आहे.
‘आत्मपॅम्फलेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आशीष भेंडे यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. ही त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातच एक मोठा टप्पा ठरली आहे.
याशिवाय, बालकलाकार कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर (नाळ २), श्रीनिवास पोकळे (नाळ २) आणि भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब!
या पुरस्कारांमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार निर्मितींना आणि प्रतिभावान कलाकारांना देशाच्या पातळीवर मान्यता मिळाल्याने, हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण आहे.
सर्व विजेते कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांचे मनापासून अभिनंदन, तसेच त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!