मराठी बातम्या ग्रूप जॉईन करा

मोबाईल गेममध्ये पैसे हरले, १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन जीवन संपवलं; नाशिकमधील घटना हादरवणारी

नाशिक | ९ जुलै २०२५

ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्यामुळे एका १६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरात उघडकीस आली आहे. सम्राट भालेराव असं या मुलाचं नाव असून, तो डायना नगर, जय भवानी रोड येथील रहिवासी होता.

गेम खेळताना हरले पैसे, नैराश्यातून टोकाचं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्राट गेल्या अनेक महिन्यांपासून मोबाईल गेमच्या नादात गुंतलेला होता. अनेक गेम्समध्ये तो पैसे लावून खेळत असे, आणि झटपट पैसे कमावण्याच्या आशेने अनेक वेळा आर्थिक नुकसानही सहन करत होता.

मंगळवारी रात्री, सम्राट आपल्या खोलीत मोबाईलवर गेम खेळत होता. त्या रात्रीसुद्धा त्याने गेममध्ये पैसे लावले होते, मात्र तो खेळ हरला. या घटनेमुळे त्याने नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

सकाळी बराच वेळ झाला तरी तो खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दार तोडलं आणि त्याचा मृतदेह आढळून आला.
सम्राटच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. घरातील एकमेव मुलगा आणि आधार हरवल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

जुगारी अ‍ॅप्सवर बंदी कधी?

या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांत संतापाची लाट आहे.

“ड्रीम ११, रम्मी सर्कल, आणि इतर अ‍ॅप्सच्या आहारी अनेक तरुण जात आहेत. काही महिन्यांपूर्वी बीडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेही चोरी केली होती. पण अजूनही यावर कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मुलांवर नियंत्रण आणि जनजागृतीची गरज

विशेष म्हणजे, अशा ऑनलाईन गेम्समुळे मुलं मानसिक तणावात जात आहेत, शिक्षणापासून दूर जात आहेत, आणि अशा टोकाच्या कृती घडत आहेत. पालकांनी मुलांवर डिजिटल नियंत्रण, संवाद आणि मार्गदर्शन ठेवणं अत्यावश्यक आहे.

या प्रकारच्या घटनांनी पुन्हा एकदा ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यांकडे लक्ष वेधलं आहे. सरकार, पोलीस प्रशासन आणि पालक यांना एकत्र येऊन यावर कारवाई आणि जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे.

Leave a Comment