बीड | प्रतिनिधी
परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात अद्यापही आरोपींना अटक न झाल्याने मराठा आंदोलकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ठाम इशारा देण्यात आला – “आठ दिवसांत अटक न झाल्यास बीड जिल्हा कडकडीत बंद करण्यात येईल.”
“आरोपी सापडले नाहीत, तर बीड बंद करावाच लागेल!”
या बैठकीला महादेव मुंडे यांचे कुटुंबीय, सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, तसेच अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. बैठकीत एकमुखी ठराव करण्यात आला की, “न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही.”
जरांगेंनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत म्हटले, “आमचे वैर बहीण-भावाशी नाही, पण आरोपी सुटलेच कसे?”
२० महिने उलटले, पण आरोपी मोकाटच!
21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. पोस्टमॉर्टेम अहवालानुसार मृतदेहावर अनेक गंभीर जखमा होत्या. मात्र २० महिन्यांनंतरही आरोपी निष्पन्न झाले नाहीत. या अतिरेकामुळे पीडित पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
29 ऑगस्टचा मुंबई मोर्चा आणि पुढील आंदोलन
जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी मोठा मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. “मराठा आरक्षण संपल्यावर मुस्लिम समाजासाठीही लढा उभारणार,” असे त्यांनी जाहीर केले.