मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांनी काल एका खळबळजनक वक्तव्यानं राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. “जितेंद्र आव्हाड यांना ठार मारण्याचा कट रचला गेला होता, आणि आरोपींच्या गाडीतून हत्यारे सापडली आहेत,” असा दावा त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “माझ्याकडे याबाबत पक्की माहिती आहे. काही लोकांनी थेट आव्हाड यांना संपवण्याचा कट केला होता. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या गाडीतून शस्त्रसाठा जप्त केला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे.”
राऊतांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, मागील काही दिवसांपासून ते सरकारवर जोरदार टीका करत आहेत.
राऊत म्हणाले की, “आव्हाड यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहायला हवे. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करतो. राज्यात जर विरोधी नेत्यांनाच धमक्या दिल्या जात असतील, तर लोकशाही धोक्यात आहे.”
यावर पोलिसांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.