भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान

विंडहोक | पीटीआय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामिबिया दौऱ्यानंतर भारत आणि नामिबिया यांच्यात बुधवारी चार महत्त्वाचे करार झाले. हे करार आरोग्य व औषधे, उद्योग केंद्र स्थापन, आणि जागतिक जैवइंधन आघाडीच्या चौकटीशी संबंधित आहेत. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि नामिबियाचे अध्यक्ष नेतुंबो नंदी-एतवाह यांच्यात झालेल्या चर्चेत डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि दुर्मीळ खनिजे यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून या चर्चेची माहिती दिली. ही मोदी यांची नामिबियाला पहिली भेट असून, भारताच्या इतिहासात नामिबिया भेट देणारे ते केवळ तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.

पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेलविचया मरॅबिलिस’ प्रदान करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष नेतुंबो नंदी-एतवाह यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. मोदी यांना 2014 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा 27 वा पुरस्कार ठरतो.

भारत-ब्राझील दरम्यान सहा करार; व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या ब्राझील दौऱ्यात मंगळवारी भारत-ब्राझील दरम्यान सहा करार करण्यात आले. या करारांचा उद्देश पुढील पाच वर्षांत दोन्ही देशांतील व्यापार २० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवण्याचा आहे. या सहकार्यांत ऊर्जा, कृषी आणि अन्य क्षेत्रे समाविष्ट आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *