बीड – बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सराईत गुन्हेगार व मकोका अंतर्गत फरार असलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते याने एक व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना थेट धमकी दिली आहे आणि “धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करू नका” असा इशारा दिला आहे.
व्हिडीओमध्ये गोट्या गित्ते रेल्वे पटरीवर बसून आपली बाजू मांडताना दिसतो. तो म्हणतो की, “वाल्मिक कराड माझं दैवत आहे. बबन गित्तेने माझ्या मित्र बापू आंधळे याला गोळ्या घालून ठार केलं. मात्र जितेंद्र आव्हाड यांना त्याविषयी काही बोलावंसं वाटत नाही. उलट माझ्यावर खोटे आरोप करून बदनाम केलं जात आहे.”
गोट्या गित्तेने आणखी म्हटलं की, “सुरेश धस, खासदार सोनवणे, अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाड हे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. मी वाल्मिक कराड यांचा कार्यकर्ता आहे. माझ्याकडे काही वाईस कॉल रेकॉर्डिंग आहे, जे लवकरच समोर येणार आहेत.”
या व्हिडिओत गोट्या गित्तेने आव्हाडांना उद्देशून स्पष्ट शब्दांत धमकी दिली आहे – “तू वंजाऱ्याचा नाहीस, तुला महागात पडेल.”
पोलीस निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह:
विशेष म्हणजे, बीड पोलीस गेल्या ३ दिवसांपासून या फरार गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. मात्र पोलिसांच्या नाकावर टिचून गोट्या गित्तेने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हा व्हिडीओ केवळ गुन्हेगारीचा गंभीर प्रकारच नव्हे, तर पोलिसांच्या तपासावरही गंभीर प्रश्न उपस्थित करतो. आता पोलीस प्रशासनाची पुढील कारवाई काय राहते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.