धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तक्रार न घेतल्याने वैतागून माय-लेकाने पोलिस ठाण्यातच विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोण आहेत पीडित?
- व्यंकटेश सतिश पडिले (पुत्र)
- संगिता सतिश पडिले (आई)
हे दोघं खाजगी सावकारांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आनंदनगर पोलीस ठाण्यात हेलपाटे मारत होते.
तक्रार घेतली नाही, पोलिसांकडून उडवा-उडवी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माय-लेक पोलिसांना वारंवार विनंती करत होते, परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल न घेता उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर हताश होऊन दोघांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच उंदर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले.
प्रशासनावर संताप; चौकशीची मागणी तीव्र
या घटनेनंतर पोलीस विभागावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आहे. नागरिकांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी अपेक्षा आहे.
ही घटना पोलीस प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही
संपूर्ण शहर हादरून सोडणाऱ्या या घटनेनंतरही पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.