मराठी बातम्या ग्रूप जॉईन करा

दापोलीतील शिक्षकाचं संतापजनक कृत्य; पाचवीत शिकणाऱ्या मुलीशी अश्लील वर्तन, शिक्षक निलंबित

दापोली (रत्नागिरी): समाजाला आरसा दाखवणाऱ्या शिक्षक पदाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना दापोली तालुक्यात घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने पाचवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला असून, आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

काय घडलं नेमकं?
ही घटना दाभोळ येथील भंडारवाडा परिसरात सोमवारी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान घडली. शाळा सुटल्यानंतर १० वर्षांची मुलगी घरी निघाली असता शाळेतील शिक्षक किशोर येवले याने “तुला न्यायला कोणी नाही का?” असं विचारत तिला दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी पुढाकार घेतला.

मुलीच्या घरी कोणी नसल्याचं पाहून, आरोपी शिक्षकाने तिच्या शरीरावर अश्लील प्रकार केला आणि तिला धमकी दिली की, “हा प्रकार कुणाला सांगू नकोस.” घाबरून गेलेल्या मुलीने नंतर तिच्या आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला.

पालकांनी घेतली पोलीस ठाण्याची धाव:
मुलीच्या पालकांनी तातडीने दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी शिक्षक किशोर येवले याला अटक केली. त्याच्यावर पॉक्सो (POCSO) कायद्यातील कलम 8/10 आणि भारतीय नवीन दंड संहितेच्या (BNS) कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक निलंबित, १४ दिवसांची कोठडी:
घटनेच्या गांभीर्याची दखल घेत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी आरोपी शिक्षकाला तत्काळ निलंबित केलं आहे. दरम्यान, आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

पुढील तपास:
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत. यापूर्वीही शिक्षकाने मुलीला सोडण्याच्या निमित्ताने अशाच प्रकारे घरी नेल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरू आहे.

शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित स्थान असावी लागते. शिक्षकाचे कर्तव्य हे मार्गदर्शन करण्याचे असते, शोषणाचे नव्हे. अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Leave a Comment