मुंबई – ‘सावली’ बारच्या प्रकरणाने आधीच तापलेल्या राजकीय वातावरणात आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील ताडदेव, अंधेरी आणि घाटकोपर या उपनगरांमध्ये ऑर्केस्ट्राच्या आडून डान्सबार चालवले जात असल्याचा खुलासा झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दोन रात्री धडक कारवाई करत तब्बल २५ बारबालांची सुटका केली असून ६० पेक्षा अधिक ग्राहक आणि चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
ताडदेव – ‘पुष्पा बार’मध्ये मध्यरात्री छापा
ताडदेव परिसरातील ‘पुष्पा बार’मध्ये अवैधपणे चालणाऱ्या अश्लील नृत्याचा पर्दाफाश शुक्रवारी मध्यरात्री गुन्हे शाखा युनिट ३ ने केला. बारमध्ये छापा टाकताना, १२ बारबाला स्टेजवर नाचताना पकडल्या गेल्या. ३२ ग्राहक त्यांच्या नृत्यावर पैसे उडवत असल्याचे आढळले. या सर्वांवर ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंधेरी – ‘साची बार अँड रेस्टॉरंट’मध्ये नियमांची पायमल्ली
अंधेरीतील ‘साची बार अँड रेस्टॉरंट’मध्येही अशीच परिस्थिती आढळली. ऑर्केस्ट्रा शोच्या नावाखाली महिलांना अश्लील नृत्यासाठी भाग पाडले जात होते. गुन्हे शाखा युनिट १० ने येथे कारवाई केली असता, ७ महिला स्टेजवर नाचताना सापडल्या. २० ग्राहकांनी त्यांना प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले. अंधेरी पोलिस ठाण्यात २६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
घाटकोपर – ‘त्रिमूर्ती बार’मध्ये महिलांची सुटका
घाटकोपर येथील ‘त्रिमूर्ती बार’मध्ये गुन्हे शाखा युनिट ७ ने छापा मारून ३–४ बारबालांची सुटका केली. या ठिकाणीही अशाच पद्धतीने ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील कार्यक्रम राबवले जात होते. नियम धाब्यावर बसवून बार चालवणाऱ्या चालक व मालकांसह एकूण १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाहेरून सुसज्ज, आतून बेकायदेशीर!
या बारमध्ये अधिक बारबालांना ठेवले जाते आणि त्यांना लपवण्यासाठी गुप्त खोल्या, खाचा तयार केल्या जातात. ग्राहकांमध्ये अनेक उच्चभ्रू वर्गातील लोकही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
कायदेशीर चौकशी सुरू, पुढील कारवाई अपेक्षित
या तिन्ही कारवायांनंतर संबंधित बारचालकांवर भारतीय दंड विधान आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे व मद्यपान कक्ष अधिनियम २०१६ अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणारे कायदे पायदळी तुडवले जात असल्याने पोलिसांची कारवाई अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
शहरात अजून किती अशा सावलीतील बार?
या प्रकारामुळे आता एक प्रश्न उभा ठाकतो – मुंबईत अजून किती बार आहेत जे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालवत आहेत? आणि त्यात महिलांचा वापर करून त्यांना अश्लीलतेकडे ढकलले जात आहे? पोलिसांचे पुढील पावले महत्त्वाची ठरणार आहेत.