बीड | प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान छाया गणेश पांचाळ या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर बीड जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील वैद्यकीय अधिकार्यांसह नर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्था आणि पीडित महिला छाया पांचाळच्या कुटुंबीयांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात किशकिंदा पांचाळ, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फक्त नर्सच निलंबित, वरिष्ठ अधिकारी अजूनही ‘सेफ’?
या प्रकरणात संबंधित नर्सचे निलंबन झाले असले, तरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राऊत आणि अन्य वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, “हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असून संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.”
२५ लाखांची मदत द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
छाया पांचाळच्या मृत्यूस आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी केली. अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला.
प्रशासनाची विश्वासार्हता सवालाखाली
या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाल्याची स्पष्ट झलक आंदोलनातून दिसून आली. “प्रसूतिच्या वेळी वेळेवर उपचार मिळाले असते, तर मृत्यू टाळता आला असता,” असा दावा अनेकांनी केला आहे.
सरकारने लक्ष घ्यावे – मागणी
आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री यांच्याकडेही लक्ष वेधून घेत कारवाईची मागणी केली. “हे प्रकरण दुर्लक्षित केल्यास आरोग्य यंत्रणेतील बेशिस्त अधिकच वाढेल,” असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.