नाशिक | प्रतिनिधी
कोणतेही खाते हे जनतेची सेवा करण्याचं एक माध्यम असतं आणि त्याचं महत्त्व कमी मानता येत नाही. नवे कृषिमंत्री ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांना विभागाचे बारकावे चांगले ठाऊक आहेत, त्यामुळे ते आपल्या खात्याला पूर्ण न्याय देतील, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
“खात्याचं महत्त्व कमी नसतं, सेवा महत्त्वाची”
नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हेच मंत्रीमंडळात खातेवाटपाचे निर्णय घेण्यास सक्षम असतात. प्रत्येक खातं जनतेसाठी महत्त्वाचं असतं.
“मला अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालय मिळाल्यावर काहींनी ‘भुजबळांची अधोगती झाली’ असं म्हटलं. पण कोरोना काळात हाच विभाग महत्त्वाचा ठरला. लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यात यश आलं आणि कुठल्याही तक्रारी आल्या नाहीत,” असे भुजबळ यांनी नमूद केले.
विरोधकांचा निशाणा, पण ‘लक्ष्यबद्ध’ नाही
विरोधक माणिक कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असले तरी, महायुतीत कोणालाही मुद्दाम लक्ष्य केलं जात नाही, असा दावा भुजबळ यांनी केला.
“कधी कधी भाजपचेही पदाधिकारी टीकेचे लक्ष्य होतात,” असंही ते म्हणाले. पालकमंत्री कोण असतील हे योग्य वेळ येईल तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
“कारागृहात बसून झालेलं नुकसान भरून कोण देणार?”
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टाने अलीकडे दिलेल्या निकालावरून भुजबळ यांनी पोलिस तपास आणि यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“दोन मोठ्या खटल्यांत वर्षानुवर्षे तुरुंगात राहिलेल्यांना अखेर निर्दोष ठरवलं जातं. मग दोष कुणाचा? पोलीस तपासात त्रुटी की यंत्रणेची कमतरता?” असा सवाल त्यांनी केला.
“मी स्वतः २ वर्ष तुरुंगात राहिलो, मनस्ताप सहन केला. सामाजिक, आर्थिक नुकसान झालं. अशा व्यक्तींना न्याय कोण देणार?” असा सवाल करत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या वेळखाऊ प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली