मुंबई | ९ जुलै २०२५
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने BE/B.Tech आणि MBA/MMS अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी ३ दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे. याबाबत माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
प्रमाणपत्रांसंदर्भातही दिलासा
या निर्णयानुसार, विविध आरक्षण प्रवर्गांतील (EWS/NCL/CVC/TVC) विद्यार्थ्यांना त्यांची मूळ प्रमाणपत्रे अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या तारखेपर्यंत सादर करता येणार आहेत. तसेच, जातप्रमाणपत्र मिळवण्यात अडचण येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही ही मोठी सवलत आहे.
नोंदणीसाठी नवीन अंतिम तारीख — ११ जुलै २०२५
BE/B.Tech आणि MBA/MMS अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ जुलै होती, ती आता ११ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या कालावधीत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.
राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी
“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देऊन हा निर्णय घेतला आहे. काही विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने अडचण होत होती. त्यामुळे अंतिम प्रवेशापर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
जर प्रमाणपत्र सादर करण्यात काही तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या, तर त्यावर मंत्रिमंडळ पातळीवर निर्णय घेऊन धोरणात्मक उपाययोजना केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी राज्य सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देत राहावी व अर्ज प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.