मुंबई | प्रतिनिधी
जगभरातील इलेक्ट्रिक वाहन क्रांतीत भारतही मागे नाही. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असून, यात दोन जागतिक दिग्गज कंपन्यांची चुरस पाहायला मिळते — अमेरिकन कंपनी टेसला आणि चिनी कंपनी बीवायडी (BYD). मात्र, सध्या या स्पर्धेत टेसलाच्या तुलनेत बीवायडीनं मोठं मार्केट कॅप्चर केलंय, असं चित्र स्पष्ट होतंय.
बीवायडीनं कशी मारली बाजी
बीवायडी ही २००७ पासून भारतात सक्रिय असून, BYD Auto 3 SUV, Seal Sedan, E6 MPV आणि Sealion 7 SUV ही चार मॉडेल्स सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या गाड्यांची किंमत ₹24.99 लाख ते ₹54.90 लाखांपर्यंत असून त्या लोकांच्या बजेटमध्ये बसत असल्यामुळे लोकप्रिय ठरत आहेत.
तर दुसरीकडे, टेसलाच्या Model 3 आणि Model Y या गाड्या अजूनही भारतात लाँच झालेल्या नाहीत. त्यांची किंमत ₹38 ते ₹45 लाखांपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे. टेसलाचं उत्पादन आयातीवर अवलंबून असल्यामुळे किंमती वाढण्याची शक्यता आहे, तर बीवायडी स्थानिक उत्पादनामुळे अधिक किफायतशीर ठरत आहे.
बॅटरी, चार्जिंग आणि रेंजमध्ये कोण भारी?
बीवायडीच्या गाड्यांमध्ये वापरण्यात आलेल्या बॅटऱ्या एका चार्जमध्ये ५५० ते ६०० किमी चालतात. विशेष चार्जरमुळे ५ मिनिटात ४५० किमीचं चार्जिंग शक्य आहे. तर टेसलाची गाडी एका चार्जमध्ये ६०० किमीपेक्षा जास्त जाते, मात्र तिचं चार्जिंग वेळखाऊ आहे.
जागतिक स्तरावरही बीवायडीची आघाडी
2024 मधील आकडेवारीनुसार, BYD नं जागतिक बाजारात ४.२७ दशलक्ष EV विकले, तर टेसलाने १.७९ दशलक्ष वाहने विकली. यावरून स्पष्ट होतं की, फक्त भारतातच नव्हे तर जगभरात BYD आघाडीवर आहे.
हैदराबादमध्ये बीवायडीचा ₹८५,००० कोटींचा प्लॅन
BYD भारतात आपलं उत्पादन अधिक वाढवत असून, हैदराबादमध्ये तब्बल ₹८५,००० कोटींचा कारखाना उभारण्याची तयारी सुरू आहे. यामुळे बीवायडीच्या गाड्या अधिक स्वस्त होतील आणि उत्पादनातही वाढ होईल.
EV क्षेत्रात सरकारचं धोरण ठोस
महाराष्ट्र सरकारने EV धोरण 2025 जाहीर केलं असून ते 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 पर्यंत लागू असेल. या धोरणानुसार:
- ₹1993 कोटींचं बजेट
- 2030 पर्यंत 30% नवीन वाहने इलेक्ट्रिक असावीत
- EV खरेदीवर 10 ते 15% सूट, कर आणि नोंदणी शुल्क माफ
- मुंबई-पुणे, समृद्धी महामार्ग, अटल सेतूवर 100% टोल माफी
सध्या भारतात EV सेगमेंटमध्ये बीवायडीनं टेसलाला मागे टाकलं आहे. किंमत, उपलब्धता, स्थानिक उत्पादन आणि सरकारच्या सवलती या गोष्टींमुळे चिनी कंपनीला भारतीयांचा अधिक प्रतिसाद मिळतोय.