प्रतिनिधी | बीड
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला गावातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने शाळेत येताना पाण्याच्या बाटलीत दारू भरून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित शिक्षक चक्क ही बाटली घेऊन शाळेच्या वर्गातही पोहोचला होता, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर प्रकार लक्षात येताच गावातील काही सजग नागरिकांनी थेट शाळेत धाव घेतली आणि संबंधित शिक्षकाला वर्गातच जाऊन जाब विचारला. शिक्षकाच्या हातातील बाटलीबाबत विचारणा केली असता, “रस्त्यात ही बाटली सापडली. त्यात मी पाणी भरलं होतं. ती फेकून द्यायची होती,” अशी सारवासारव शिक्षकाने केली. मात्र ग्रामस्थांनी शिक्षकाच्या या उत्तरावर विश्वास ठेवला नाही.
गावकऱ्यांनी विचारले की, “रस्त्यात सापडलेली बाटली तुम्ही थेट वर्गात का आणली?” यावर शिक्षकाने आणखी एक कारण सांगत म्हटले की, “शाळेसमोरील काकू त्यांच्या घरासमोर काही टाकू देत नाहीत, म्हणून बाटली शाळेत आणली.” या सर्व वादग्रस्त संवादाचा व्हिडिओ नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित केला.
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, तलवाडा पोलीस ठाण्यात या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ पुढाकार घेत संबंधित शिक्षकाला तपासणीसाठी नेले असून, वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे.
दुसरीकडे, शाळेप्रमाणे पवित्र ठिकाणी शिक्षकाने असे वर्तन केल्याने ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. “शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आदर्श असतो, पण जर तोच दारूच्या नशेत वर्गात येत असेल, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कोणाच्या हातात?” असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
संबंधित शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, यावर शिक्षण विभाग काय भूमिका घेतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.