प्रतिनिधी | बीड
बीड : बीड जिल्ह्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन मारहाणीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बीडचे ‘नविन बिहार’ म्हणून ओळख वाढत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.
शिरूर कासार तालुक्यातील घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्याची शांतता भंग झाली आहे. शेतात दगड का टाकले, एवढा साधा प्रश्न विचारल्यावर दोघांवर बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पीडितांनी याबाबत शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शेतात अनधिकृतपणे दगड टाकल्याने वाद निर्माण झाला. स्थानिकांनी जबाबदारी निश्चित करण्यासाठी संबंधित व्यक्तीला प्रश्न विचारला. परंतु, त्याचा राग आल्याने दोघांवर जोरदार हल्ला करण्यात आला. मारहाणीत दोघांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात वाढत चाललेल्या हिंसक घटना रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.