मुंबई | प्रतिनिधी
नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, ठाण्यातील एका महिला होमगार्डने दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी या महिलेची पत्रकार परिषदेत उपस्थिती लावून, “हे हनी ट्रॅप नव्हे, तर थेट अत्याचार आहे,” असा स्पष्ट दावा केला.
पीडित महिलेने ठाण्यातील दोन एसीपींचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवत आपली व्यथा मांडली. तिच्या मते, जिममध्ये ओळख वाढवून एका एसीपीने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि सतत संपर्कात राहिला. एक दिवस चहा प्यायला बोलवून, पत्नीशी फोनवर बोलणं घडवून आणलं. विश्वास बसल्याने ती त्याच्या घरी गेली. मात्र तिथे पाण्यात गुंगीचं औषध देऊन तिच्यावर दोघांनी मिळून अत्याचार केला, असा आरोप तिने केला.
करुणा मुंडे म्हणाल्या, “तक्रार नोंदवू नये म्हणून या महिलेवरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या मुलींनाही त्रास दिला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला न्यायासाठी धडपडत आहे, पण आरोपी अधिकारी असल्याने कोणीही तिच्या मदतीला पुढे येत नाही.”
या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट आरोप झाल्याने प्रशासनाची चौकशी सुरू होणार का, याकडे लक्ष लागले आहे.