धाराशिव, ४ ऑगस्ट : येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धाराशिवमधील महाकाली कलाकेंद्रात सोमवारी सायंकाळी मोठी हाणामारी झाली. ८ ते १० जणांनी मिळून दोन व्यक्तींवर दगड, फरशी आणि लाकडाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये संदीप गुट्टे या युवकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या धाराशिव सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या हाणामारीमध्ये गोळीबार देखील झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. मात्र पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेला नाकारत “गोळीबार झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत,” असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या घटनेमागचं खरं कारण आणि सत्य काय? हे स्पष्ट होणं आवश्यक बनलं आहे.
हाणामारीचा कारण काय?
येरमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, हाणामारीचे मूळ कारण जुना वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात अक्षय साळुंखे, राज पवार आणि विजय साळुंखे या तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी संदीप गुट्टे याला फरशी, दगड आणि लाकडाने जबर मारहाण केली.
संदीप गुट्टे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुन्हा दाखल, आरोपी फरार
या प्रकरणी भा.दं.वि. कलम ३०७ (प्राणघातक हल्ला) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. यातील मुख्य आरोपी अक्षय साळुंखे हा सोलापूर जिल्ह्यातून तडीपार असल्याची माहिती मिळाली आहे.
गोळीबाराची चर्चा – संशय कायम
दुसरीकडे, या घटनेदरम्यान गोळीबार झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. मात्र याबाबत पोलीस अधिकृतपणे काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे गोळीबार झाला की नाही?, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
धाराशिवमध्ये घडलेली ही घटना केवळ हाणामारीपुरती मर्यादित नसून, तिच्यामागे काही गौडबंगाल असल्याचा संशय बळावत आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे सत्य हळूहळू समोर येण्याची शक्यता आहे.