अहिल्यानगर (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या तिसगाव (वाळुंज शिवार) परिसरात बनावट नोटा तयार करणारा कारखाना उघडकीस आला असून, एकूण सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारखान्यातून ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह प्रिंटर, विशेष कागद आणि सुमारे ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, या टोळीचा मुख्य सूत्रधार अंबादास ससाने फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
अहिल्यानगर पोलिसांची टाकसाळावर कारवाई
नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर पोलिसांना २७ जुलै रोजी सोलापूर रस्त्यावरील अंबिलवाडी येथे दोन संशयित व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून निखिल गांगर्डे व सोमनाथ शिंदे यांना ताब्यात घेतले. चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप कापरे, विनोद अरबट, आकाश बनसोडे, मंगेश शिरसाठ आणि अनिल पवार यांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी तिसगाव येथील एका भाड्याच्या खोलीत सुरू असलेला बनावट नोटा छपाईचा कारखाना उघडकीस आणला. येथे आधुनिक छपाई यंत्रणा, बनावट नोटा तयार करण्याचा विशेष कागद, रंग, शाई आदी साहित्य सापडले. पोलिसांनी या ठिकाणाहून ५९ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या छापलेल्या बनावट नोटा आणि इतर साहित्य मिळवले, ज्याद्वारे सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार करता आल्या असत्या.
कारागृहातून ओळख – टोळीची निर्मिती
मुख्य सूत्रधार अंबादास ससाने याला यापूर्वीही बनावट नोटा प्रकरणात अटक झाली होती. तो हरसूल कारागृहात शिक्षा भोगत असताना तिथेच मंगेश शिरसाठ व आकाश बनसोडे यांची त्याच्याशी ओळख झाली. ससाणेने त्यांना बनावट नोटा छापण्याचा प्रस्ताव दिला आणि जेलबाहेर आल्यावर त्यांनी टोळी उभी केली.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे उलगडला गुन्हा
टोळीतील काही सदस्यांनी पानटपरीवर दोन वेळा पाचशे रुपयांच्या नोटा वापरून सिगारेट विकत घेतल्या, त्यामुळे टपरीचालकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची साखळी उलगडत अखेर कारखाना उघडकीस आणला.
बँक अधिकाऱ्यांची विशेष बैठक
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. बनावट नोटा ओळखण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आणि शंका आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या जातील.