छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहाची मान्यता रद्द; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अमानवी व अघोरी प्रकारांनी राज्यभर खळबळ उडवली आहे. बुधवारी विधान परिषदेत या प्रकरणाचे पडसाद उमटले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संस्थेची मान्यता तत्काळ रद्द करण्याची आणि जिल्हा बालविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्याची घोषणा केली.

काय आहे प्रकरण?

भाजप आमदार चित्रा वाघ आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. त्यांनी सांगितले की,

“या सुधारगृहात आजारी मुलींवर पाणी शिंपडणे, कपाळावर आणि शरीरावर ‘क्रॉस’ चिन्हे काढणे असे अघोरी प्रकार सुरू होते.”

८० मुलींची चौकशी, गंभीर माहिती उघड

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर उत्तर देताना सांगितले की,

“या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी ८० मुलींशी चर्चा केली असून, हळूहळू गंभीर माहिती समोर येत आहे.”

त्यानंतर सुधारगृहाच्या अधीक्षक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सरकारची ठाम भूमिका: पुन्हा मान्यता नाही!

मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की:

  • संस्थेची मान्यता तत्काळ रद्द करण्यात येईल
  • कार्यकाळ संपल्यास पुन्हा मान्यता दिली जाणार नाही
  • दोषी ठरल्यास संबंधितांना निलंबित करून कठोर कारवाई केली जाईल

उच्च न्यायालयाचीही दखल

या प्रकरणाची उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली असून विशेष निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की,

“सरकार स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. कुणीही या प्रकरणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत केली असल्यास, त्यालाही निलंबित करण्यात येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *